भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही हाटा जाऊं लवकरी येऊं । नैवेद्य पाठवूं नाम्या हातीं

amhi hata jaun lavakari yeun | naivedya pathavun namya hatin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आम्ही हाटा जाऊं लवकरी येऊं । नैवेद्य पाठवूं नाम्या हातीं ॥१॥ दुसर्‍या दिवशीं नैवेद्य धाडिला । दामसेठी गेला त्याच्या मागें ॥२॥ जाऊनियां नामा उभा राहे सन्मुख । म्हणे विठोबास जेवी बापा ॥३॥ देव म्हणे नाम्या बैसावें दारांत । लवकरी जेवितों पाहे आतां ॥४॥ जेऊनियां देवें हातीं दिधली वाटी । तेव्हां दामसेठी काय बोले ॥५॥ बारा वर्षें तुज उपवासी मारिलें । आजि जेवविलें नामदेवें ॥६॥ देव म्हणे आतां ऐका दामसेठी । हे तों गुह्य गोष्टी बोलूं नका ॥७॥ आम्ही न बोलतां आम्ही न सांगतां । कळे अवचिता आपणांसी ॥८॥ करसी चोरी तूं गुप्त गोकुळांत । पृथ्वींत मात कोणी नेली ॥९॥ गोकुळींच्या गोष्टीं येथें बोलू नये । मौन पंढरिये धरिलें आहे ॥१०॥ मौन धरियेलें सांगसी आम्हासी । तरी कां जेवशी पांडुरंगा ॥११॥ काय तुझें घर पडियेलें ओस । चोख्यासंगें कैसा जेवलासी ॥१२॥ चोखियाचें अन्न मिष्टान्न भोजन । मिळाया कारण तेथें नाहीं ॥१३॥ राम अवतारी वान्नरगणें लंकेसी झोबणें सीतेसाठीं ॥१४॥ पाला खाऊनियां वाहिले पर्वत । बांधियेला सेतु सिंधूवरी ॥१५॥ कृष्णा अवतारीं गोपाळ साचारा । वळूं गायी फार देवासवें ॥१६॥ यमुनेचे तारीं खेळूं चेंडूफळी । आपण दिधली नाहीं डावि ॥१७॥ पसरितों पदर धरितों हनुवटी । अन्याय हा पोटीं घालीं नाम्या ॥१८॥ तेव्हां दामसेठी धरूनि हातासी । म्हणे नामयासी चाल घरा ॥१९॥ धन्य माझें भाग्य धन्य माझा वंश । परब्रह्म वेष प्रगटलें ॥२०॥ बौद्ध अवतारीं आम्हीं जालों संत । वर्णावया मात नामाअ म्हणे ॥२१॥