भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसी प्रदक्षिणा करुनी विष्णुभक्ता । नामा जालासे सरता

aisi pradakshina karuni vishnubhakta | nama jalase sarata

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसी प्रदक्षिणा करुनी विष्णुभक्ता । नामा जालासे सरता । रुक्मिणी म्हणे यातं तत्वतां । वैकुंठासी न्यावें जी ॥१॥ नामा म्हणे नेघे मुक्ती । मज पंढरीची आर्ती । विठठलनामें करीन कीर्ती । नित्यकाळ जीवन्मुक्त ॥२॥ मज नित्यमुक्ता जन्म नाहीं । केशवासी माते पुसोनि पाही । युगनयुगी अवतार दाही । याचेनि संगें मज घडती ॥३॥ तिहीं त्रिभुवनीं उदार । मुक्ति तुम्हापाशीं साचार । परि भक्तिविण मुक्ति असार । कोण पामर इच्छिल ॥४॥ मुक्ति फलकट नैश्वर । फळ एक विठठल सार । विष्णुभक्तीसी ज्याचा निर्धार । त्याचे चरण वंदीन माथां ॥५॥ विष्णुविण कीर्तन न करीं । भक्तिविण नसे क्षणभरी । कीर्तन करीन गजरीं । रामकृष्णगोविंद ॥६॥ मज नामाचें अमृत । माझें मुक्ति दास्य करी । तूं मूळमाता जाणसी जरी । तरी तुजसीं हें गुह्य बोलिलों ॥७॥ नामदेव परतोनी पाहे । तंव ज्ञानदेवें उभारिले बाहे । म्हणे विष्णुभक्ति ऐसी आहे । आइक माते इचा बडिवारु ॥८॥