भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें केशियाचें हनन । केलें देखोनियां सकळ जन गोकुळीचें विस्मयपत्र म्हणती न कळे महिमान श्रीहरिचें

aisen keshiyachen hanan | kelen dekhoniyan sakal jan gokulichen vismayapatra mhanati na kale mahiman shriharichen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसें केशियाचें हनन । केलें देखोनियां सकळ जन गोकुळीचें विस्मयपत्र म्हणती न कळे महिमान श्रीहरिचें ॥१॥ कृत्रिम वेषिया तुरंगम । आला इच्छूनियां सग्राम । कैसा जाणूनियां मेघ:शाम । तयावरी सरसावला ॥२॥ त्याची केलीचि कार्यसिध्द । तोडूनियां आधिव्याधि । बैसविला तो सभासंधी । मुक्तिस्थानीं मुक्ताचियें ॥३॥ वार्ता गेली कंसासुरा । मर्दिलें केशिया महावीरा । गोकुळी आनंद नारीनारां । हषें साखरा वांटिती ॥४॥ कंस म्हणे विपरीत भाग्य । झालें ओढवलें उपसर्ग । गेले माझे हे अंगलग । आतां विश्वास कोणाचा ॥५॥ गगनवाणी ऐकियेली जेव्हां । सुत देवकीचा आठवा । तोचि वधील दैत्यां सर्वां । तों हें विपरीत वर्तलें ॥६॥ गोकुळामाजीं तुझा वैरी । नाहीं ऐकिलें भविष्यांतरी । एकचि वदली ते कुमारी । जें कां निष्ठिली हातींची ॥७॥ व्यर्थचि पिडियेली देवकी । आणि वसुदेवही पुण्यश्रलोकी । होणार न चुकेचि कीं सेखीं । विघ्न आणिकचि उदेलें ॥८॥ निळा म्हणे ऐसियापरी । कंस निमग्न दु:खसागरीं । गेली ऐश्रवर्याची धारी । पडिला शरीरीं निचेष्टित ॥९॥