भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें देखिलें वैष्णवीं । वैकुंठ नगरी चिरंजीवी

aisen dekhilen vaishnavin | vaikunth nagari chiranjivi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसें देखिलें वैष्णवीं । वैकुंठ नगरी चिरंजीवी । आणि ज्ञानदेव गोसावी । विष्णुमूर्ती चतुर्भुज ॥१॥ तालालोरी वाजविती पावा । समाधान होतसे जीवां । नामा विनवितो केशवा । तुझ्या दरुशनें निवालों ॥२॥ तंव रुक्मिणीनें विनविलें । यासि भोजन सारा कां वहिलें । तंव अक्रूरें पाचारिलें । समस्तांसीं देखा ॥३॥ उद्धव घालित आसनें । ताटें विस्तारिलीं बोनें । राही रुक्मिणी विचक्षणें । पंचामृतें वाढिती ॥४॥ समस्त भक्त दाटले । पांतीकर एकवटले । नानापरी भात विस्तारिले । परिमळित मघमघां ॥५॥ वरी मिरवे मुगांचे वरण । कथिका वाढिली संपूर्ण । नाना कोरिकें विस्तीर्ण । रुक्मिणी वाढितसे ॥६॥ कामधेनूचें घृत । पयोदधिक्षीर वाढित । नानापत्र शाखा शोभत । वैष्णवांचा ताटीं ॥७॥ ऐसें समस्तांसीं संपूर्ण । ताटें जालीं विस्तीर्ण । तंव देव बोलती आपण । ज्ञानदेवासी ॥८॥ निवृत्ती सोपान बोलवा । मुक्ताईस वेगीं आणवा । पांथिकरासी रिघावा । ताटीम बैसवा समस्तांसी ॥९॥ विष्णुमूर्ती चतुर्भुज । पूजी ब्राह्मण द्विभुज । तुळसी मंजिरी केसिराज । त्यांचे मस्तकीं वाहतसे ॥१०॥ चरणतीर्थ घेतलें । तेणें समस्त मंदिर शिंपिलें । आपण मुखीं घातलें म्हणे । कृतकृत्य जालों मी ॥११॥ नामा तिष्ठत उभा द्वारीं । त्यासीही रुक्मिणी ताट करी । ऐसीं भोजनें परोपरी । जालीं वैष्णवांचीम ॥१२॥