भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें ऐकोनियां प्रेमा आला पोटीं । म्हणे बोलावी ते गोष्टी अनुभवाची

aisen aikoniyan prema ala potin | mhane bolavi te goshti anubhavachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसें ऐकोनियां प्रेमा आला पोटीं । म्हणे बोलावी ते गोष्टी अनुभवाची ॥१॥ येर ते कर्मधर्म सर्वही पाल्हाळ । श्रमुचि केवळ जाणिवेचा ॥२॥ ऐसा संत भेटे विरळा भाग्ययोगें । जो आथिला वैराग्यें सप्रेमळू ॥३॥ सर्वभूतीं दया सर्वभावें करुणा । जेथें मीतूंपणा मावळला ॥४॥ भजन तयां नांव वाटे मज गोड । येर ते काबाड वायांविण ॥५॥ नमन ते नम्रता न देखें गुणदोष । अंअरी प्रकाश आनंदाचा ॥६॥ येर ते दांभिक जाणावे मायावी । विश्वास मी जीवीं न धरी त्यांचा ॥७॥ ध्यान तया नांव निर्विकार निकें । जें विश्वीं माझ्या देखें विठोबासी ॥८॥ अखंड ह्रदयीं तेचि आठवण । साजिरे समचरण विटेवरी ॥९॥ नादीं लुब्ध जैसें आसक्त हरिण । जाय विसरोन देहभाव ॥१०॥ यापरि तल्लीन दृढ राखें मन । या नांवें श्रवण आवडीचेम ॥११॥ व्यवसायीं चित्त ठेवुनी कृपण । लाभाचें चिंतन सर्वकाळ ॥१२॥ यापरि अखंड स्वहित विचारण । करिजे तें मनन सत्वशीळ ॥१३॥ परपुरुषीं जैसी आसक्त व्यभिचारिणी । न लागे तिच्या मनीं कामधाम ॥१४॥ कीटकीं भृंगुटिये जैसें अनुसंधान । निकें निजध्यासन एकविध ॥१५॥ सर्वभावें एक विठठलुचि ध्याये । सर्वांभूतीं पाहे रुप त्याचें ॥१६॥ सर्वांहूइ निराळा रजतमावेगळा । भोगीं प्रेमकळा तेचि भक्ति ॥१७॥ सत्वाचा सुभटु असंग एकटु । वैराग्य उद्‌भटू एकनिष्ठ ॥१८॥ प्रारब्धाचा भोगी नेणें देहस्मृती । अखंड ते धृति निर्विकार ॥१९॥ निर्वासना मन निजलाभें संपूर्ण । नेणें स्वरुपज्ञान विकल्पाचें ॥२०॥ अनुरागेम गोविंद ध्यायिजे एकांतीं । यापरती विश्रांति आणिक नाहीं ॥२१॥ कायावाचामनें हा माझा अनुभव । सांगितला सर्व आवडीचा ॥२२॥ नामा म्हणे हेंहि वोलविलें तेणें । उदार सर्वज्ञें पांडुरंगें ॥२३॥