भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा सोपान संबोखिला । महा उत्सव आनंद जाला

aisa sopan sambokhila | maha utsav anand jala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसा सोपान संबोखिला । महा उत्सव आनंद जाला । अभय वर दिधला । गर्जिन्नला देवराणा ॥१॥ म्हणे तूतें न विसंबे । संवत्सरीं असेन स्वयंभें । या वटेश्व्वरीं सगुण सुलभे । समारंभ प्रतिवर्षी ॥२॥ सिद्धसाधकाचें स्थळ । तो हा वटेश्वर सानुकुळ । यासी म्हणती सोडविल नीळकंठ । शीतळ प्रथम नाम ॥३॥ पूर्वीं हें ब्रह्मयाचें स्थान । तेणें येथें तप साधिलें गहन । प्रत्यक्ष शंकरा सुप्रसन्न । आशीर्वाचन बोलिले ॥४॥ इंद्रनीळ पर्वत रूप । प्रत्यक्ष नारायण स्वरूप । असे कौंडिण्यपुर समीप । माता साक्षेपें ॥५॥ ऋषिगण गंधर्व । क्षेत्रपाळ मल्हारी देव । इंद्र चंद्र ब्रह्मदेव । शुद्ध ठाव नेमिला ॥६॥ नामा म्हणे जनार्दन । बहुत संतोषला सोपान । अंगें ब्राह्मण सनातन । शुद्ध अधिष्ठान दिधलें ॥७॥