भजनी मालिका
← भजनांकडे परत

आई मज ह्मणसील अवगुणांचें । तरी मी काय करितों कोणाचें । जें जें होणार जयाचें । तें कां मजवरी घालिसी

ai maj hmanasil avagunanchen | tari mi kay kariton konachen | jen jen honar jayachen | ten kan majavari ghalisi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आई मज ह्मणसील अवगुणांचें । तरी मी काय करितों कोणाचें । जें जें होणार जयाचें । तें कां मजवरी घालिसी ॥१॥ भट आलासे माभळ । तेणें वर्णिल जन्मकाळ । तो चुकला ग्रहमूळ । तेणें त्यासी पाडिलें ॥२॥ माये तीच मावशी । तिनें मज घेतलें वोसंगासी । तिचे अंगीं होती विवशी । तिनें तिसी ग्रासिलें ॥३॥ दहीं भात रत्नताटीं । कालवूनि लावीं माझे ओंठी । जेवितां काग घाली मिठी । धरूनि मुष्टी रगडिला ॥४॥ कैसी पाठविली रिठा-गांठी । ती घातली माझे कंठीं । तेणें माझ्या गळां मिठी । मग म्यां दाढे रगडिली ॥५॥ खेळत होतों यमुनेतटीं । बक लागला माझे पाठी । मग मी धरूनि चंचु उपटीं । धरणीवरी आपटिला ॥६॥ आई म्यां तुझें काय केलें । त्वां मज उखळासी बांधिलें । रांगत रांगत अंगणीं आलों । तेणें वृक्ष उन्मळिले ॥७॥ ऐसा नाटकी ह्लषिकेशी । परब्रह्म दावी यशोदेसी । विष्णुदास नामा अह-र्निशीं । ह्लदय कमळीं पाहातसे ॥८॥