भजनी मालिका
← भजनांकडे परत

आदि पुरुषा जय विश्वंभरिता

adi purusha jay vishvambharita

आदि पुरुषा जय विश्वंभरिता नानापरि तुझा खेळू । जया ब्रह्मगोळु कल्पकोडी घडी मोडिता नलगे वेळु । वेदपुराणें मत्सरें भांडती बहुतें करित होती कोल्हाळु । होय नव्हे ऐसी भ्रांतिसी गुंतली तयासि तूं आकळु गा ॥१॥ तुझें नाम बरवें तुझें नाम बरवें । हरि वोळगों आपुल्या साच भावें ॥ध्रु०॥ गायत्री पासाव वोळलें क्षीर करणी पासाव विस्तारु । दूध दही ताक नवनीत आगळे चहूंचा वेगळा परिभरु । जो ज्याविषयें पढिये तोचि मानिती थोरु । सांठवण करिंता एकवट नव्हे तैसा नव्हे भक्तिआचारु ॥३॥ कवणा एका राया बहुत पैं सेवक त्यासि दिधला वेगळा व्यापार । आपलाले म्हणिये सुचित राहटतां मान करील अपार । समर्थाचा मोहो जाणुनि वेगळा करुं नये तयासि मत्सर । साभिलाषपणें वर्ततां देखेल शिक लाविल हा निर्धार ॥४॥ कव्हणा एका राया बहुत पै लेंकुरें आळविती नाना परी । ऐकें पाठीचीं एकें पोटीचीं एकें वडिलें एकें धारि सेखीं सारिखाचि मोहो करी । द्वैतभेदु जया नव्हे संवादु सेखीं तयासि तो निर्धारु गा ॥५॥ सागरींचे तरंग आनेआन उमटती तेतुले अवतार होती । शिव केशव उंच नीच आगळे कासियानें मानावी भक्ति । परमात्मया सौरसें तेचि हे मानली विश्वमूर्ति । बापरखुमादेविवरा विठ्ठला परियेसी ज्ञानदेवो करिताहे विनंति गा ॥६॥