भजनी मालिका
← भजनांकडे परत

अचळ धरा तैसें पीठ । पायातळीं मिरवे वीट

achal dhara taisen pith | payatalin mirave vit

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अचळ धरा तैसें पीठ । पायातळीं मिरवे वीट ॥१॥ दोन्हीं पाउलें समान । जैसे योगीयाचे नयन ॥२॥ जानु जंघ ते स्वयंभ । जैसे कर्दळीचे स्तंभ ॥३॥ कसीयलें पीतवसन । झळके विधुल्लते समान ॥४॥ शेष बैसला वेटाळां । तैसा कटिबंध मेखळा ॥५॥ समुद्र खोलीये विशाळ । तैसें नाभीचें मंडळ ॥६॥ तुळसी मंजरिया गळां । जैशा सुटल्या मेघमाळा ॥७॥ दिग्गजाचे शुंडादंड । तैसे कटीं कर प्रचंड ॥८॥ पूर्णिमेचा उदो केला । तैसा मुखचंद्र शोभला ॥९॥ जैसीं नक्षत्रें झमकतीं । तैसी कुंडलें चमकतीं ॥१०॥ सूर्य मिरवे नभमंडळा । तैसा केशराचा टिळा ॥११॥ क्षीराब्धीचे चंचळ मीन । तैसें नेत्री अवलोकन ॥१२॥ जैसें मेरुचें शिखर । तैसा माथां मुगुट स्थिर ॥१३॥ इ्ंदु प्रकाशें वेढिला । तैसा क्षीरोदकें वेष्टिला ॥१४॥ तृप्तीलागीं चातकपक्षी । निळा तैसा ध्यान लक्षी ॥१५॥