भजनी मालिका
← भजनांकडे परत

विचार करिती बैसोनि गौळणी । ज्या कृष्णकामिनी कामातुरा

vichar kariti baisoni gaulani | jya krushnakamini kamatura

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विचार करिती बैसोनि गौळणी । ज्या कृष्णकामिनी कामातुरा ॥१॥ एकांती एकल्या एका च सुखाच्या । आवडती त्यांच्या गोष्टी त्यांला ॥२॥ तर्कवितर्किणी दुराविल्या दुरी । मौन त्या परिचारी आरंभिलें ॥३॥ कुशळा कवित्या कथित्या लोभिका । त्या ही येथें नका आम्हांपाशीं ॥४॥ बोलक्या वाचाळा कृष्णरता नाहीं । यां चोरोनि तींहीं खेट केली ॥५॥ भेऊनियां जना एकी सवा झाल्या । वाती विझविल्या दाटोबळें ॥६॥ कृष्णसुख नाहीं कळलें मानसीं । निंदिती त्या त्यासी कृष्णरता ॥७॥ तो नये जवळी देखोनि कोल्हाळ । म्हणउनि समेळ मेळविला ॥८॥ अंतरीं कोमळा बाहेरी निर्मळा । तल्लीन त्या बाळा कृष्णध्यानीं ॥९॥ हरीरूपीं दृष्टि कानीं त्याची गोष्टी । आळंगिती कंठीं एका एकी ॥१०॥ न साहे वियोग करिती रोदना । भ्रमिष्ट भावना देहाचिया ॥११॥ विसरल्या मागें गृह सुत पती । अवस्था याचिती गोविंदाची ॥१२॥ अवस्था लागोनि निवळ चि ठेल्या । एका एकी झाल्या कृष्णरूपा ॥१३॥ कृष्ण म्हणोवूनी देती आलिंगन । विरहताप तेणें निवारेना ॥१४॥ ताप कोण वारी गोविंदावांचूनि । साच तो नयनीं न देखतां ॥१५॥ न देखतां त्यांचा प्राण रिघों पाहे । आजि कामास ये उशिर केला ॥१६॥ रित्या ज्ञानगोष्टी तयां नावडती । आळिंगण प्रीती कृष्णाचिया ॥१७॥ मागें कांहीं आम्ही चुकलों त्याची सेवा । असेल या देवा राग आला ॥१८॥ आठविती मागें पापपुण्यदोष । परिहार एकीस एक देती ॥१९॥ अनुतापें झाल्या संतप्त त्या बाळा । टाकुनि विव्हळा धरणी अंग ॥२०॥ जाणोनि चरित्र जवळी च होता । आली त्या अनंता कृपा मग ॥२१॥ होउनी प्रगट दाखविलें रूप । तापत्रय ताप निवविले ॥२२॥ निवाल्या देखोनि कृष्णाचें श्रीमुख । शोक मोह दुःख दुरावला ॥२३॥ साच भाव त्यांचा आणुनियां मना । आळंगितो राणा वैकुंठींचा ॥२४॥ हरीअंगसंगें हरीरूप झाल्या । बोलों विसरल्या तया सुखा ॥२५॥ व्यभिचारभावें भोगिलें अनंता । वर्तोनि असतां घराचारी ॥२६॥ सकळा चोरोनि हरी जयां चित्ती । धन्य त्या नांदती तयामध्यें ॥२७॥ उणें पुरें त्यांचें पडों नेंदी कांहीं । राखे सर्वां ठायीं देव तयां ॥२८॥ न कळे लाघव ब्रम्हादिकां भाव । भक्तिभावें देव केला तैसा ॥२९॥ तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार । साधिलें अपार निजसुख ॥३०॥