भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेद नेतां शंखासुरी । मत्स्य अवतार होय हरी

ved netan shankhasuri | matsya avatar hoy hari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेद नेतां शंखासुरी । मत्स्य अवतार होय हरी ॥१॥ मारुनियां शंखासुरा । ब्रम्हया तोषविलें निर्धारा ॥२॥ रसातळा जातां अवनी । तळीं कांसव चक्रपाणी ॥३॥ काढोनियां चौदा रत्ने । गौरविला सुरभूषण ॥४॥ हिरण्याक्षें नेतां धरा । आपण सूकर पै जाहला ॥५॥ मारुनि दैत्यासी । सुखी केलें देवांसी ॥६॥ प्रल्हादाकारणें । स्तंभामाजीं गुरगुरणें ॥७॥ धरुनियां जानूवरी । वधिला हिरण्यकश्यपू निर्धारीं ॥८॥ इंद्राच्या कैवारें धांवून । रुप धरिलें वामन ॥९॥ बळी पाताळीं घातिला । आपण द्वारपाळ जाहला ॥१०॥ सहस्त्रार्जुनें पीडिलें । आपण परशराम जाहले ॥११॥ पितृआज्ञा मानुनी खरी । माता वधिली निर्धारीं ॥१२॥ सीतेचें करुनी मीस । केला राक्षसांचा नाश ॥१३॥ चौदा वर्षें वनांतरीं । वनवास सेवी हरी ॥१४॥ वसुदेवदेवकीसाष्ठीं । अवतार धरिलां पोटीं ॥१५॥ मारुनियां कंसासुर । उतरिला मेदिनीचा भार ॥१६॥ येऊनियां पंढरपुरा । धरिला विटेवरी थारा ॥१७॥ पुंडलिकासाठीं उभा । एका जनार्दनीं शोभा ॥१८॥