भजनी मालिका
← भजनांकडे परत

वर्म दावी सोपें भाविकां गोपाळां । वाहे त्यांच्या गळां पाले माळा

varma davi sopen bhavikan gopalan | vahe tyanchya galan pale mala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वर्म दावी सोपें भाविकां गोपाळां । वाहे त्यांच्या गळां पाले माळा ॥१॥ मान देती आधीं मागतील डाव । देवा तें गौरव माने सुख ॥२॥ मानती ते मंत्र हमामा हुंबरी । सिंतोडिती वरी स्नान तेणें ॥३॥ वस्त्रें घोंगडिया घालुनियां तळीं । वरी वनमाळी बैसविती ॥४॥ तिंहीं लोकांसी जो दुर्लभ चिंतना । तो धांवे गोधना वळतियां ॥५॥ यांच्या वचनाचीं पुष्पें वाहे शिरीं । नैवेद्य त्यांकरीं कवळ मागे ॥६॥ त्यांचिये मुखींचें हिरोनियां घ्यावें । उच्छिष्ट तें खावें धणीवरी ॥७॥ वरी माथां गुंफे मोरपिसांवेटी । नाचे टाळी पिटी त्यांच्या छंदें ॥८॥ छंदें नाचतील जयासवें हरी । देहभाव वरी विसरलीं ॥९॥ विसरली वरी देहाची भावना । ते चि नारायणा सर्वपूजा ॥१०॥ पूजा भाविकांची न कळतां घ्यावी । न मागतां दावी निज ठाव ॥११॥ ठाव पावावया हिंडे मागें मागें । तुका म्हणे संगें भक्तांचिया ॥१२॥