भजनी मालिका
← भजनांकडे परत

उद्धवअक्रूरासी । आणीक व्यासआंबॠषी । रुक्मांगदाप्रल्हादासी । दाविलें तें दाखवीं

uddhavaakrurasi | anik vyasaambarushi | rukmangadapralhadasi | davilen ten dakhavin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उद्धवअक्रूरासी । आणीक व्यासआंबॠषी । रुक्मांगदाप्रल्हादासी । दाविलें तें दाखवीं ॥१॥ तरि मी पाहेन पाहेन । तुझे श्रीमुखचरण । उताविळ मन । तयाकारणें तेथें ॥ध्रु.॥ जनकश्रुतदेवा करीं । कैसा शोभलासी हरी । विदुराच्या घरीं । कण्या धरी कवतुकें ॥२॥ पांडवा अकांतीं । तेथें पावसी स्मरती । घातलें द्रौपदी । यागीं बिरडें चोळीचें ॥३॥ करी गोपीचें कवतुक । गाईगोपाळांसी सुख । दावीं तें चि मुख । दृष्टी माझ्या आपुलें ॥४॥ तरि तूं अनाथाचा दाता । मागतियां शरणागतां । तुका म्हणें आतां । कोड पुरवीं हें माझें ॥५॥