भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेरा दिवस जाले निश्चक्र करितां । न पवसी अनंता मायबापा

tera divas jale nishchakra karitan | na pavasi ananta mayabapa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तेरा दिवस जाले निश्चक्र करितां । न पवसी अनंता मायबापा ॥१॥ पाषाणांची खोळ घेउनि बैसलासी । काय हृषीकेशी झालें तुज ॥ध्रु.॥ तुजवरी आतां प्राण मी त्यजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा ॥२॥ फार विठाबाई धरिली तुझी आस । करीन जीवा नास पांडुरंगा ॥३॥ तुका म्हणे आतां मांडिलें निर्वाण । प्राण हा सांडीन तुजवरी ॥४॥