भजनी मालिका
← भजनांकडे परत

तयांसवें करी काला दहींभात । सिदोऱ्या अनंत मेळवुनी

tayansaven kari kala dahimbhat | sidorya anant melavuni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तयांसवें करी काला दहींभात । सिदोऱ्या अनंत मेळवुनी ॥१॥ मेळवुनी अवघियांचे एके ठायीं । मागें पुढें कांहीं उरों नेदी ॥२॥ नेदी चोरी करूं जाणे अंतरींचें । आपलें हीं साचें द्यावें तेथें ॥३॥ द्यावा दहींभात आपले प्रकार । तयांचा वेव्हार सांडवावा ॥४॥ वांटी सकळांसि हातें आपुलिया । जैसें मागे तया तैसें द्यावें ॥५॥ द्यावें सांभाळुनी सम तुकभावें । आपण हि खावें त्यांचें तुके ॥६॥ तुक सकळांचे गोविंदाचे हातीं । कोण कोणे गति भला बुरा ॥७॥ राखे त्यासि तैसें आपलाल्या भावें । विचारुनि द्यावें जैसें तैसें ॥८॥ तैसें सुख नाहीं वैकुंठींच्या लोकां । तें दिलें भाविकां गोपाळांसि ॥९॥ गोपाळांचे मुखीं देउनी कवळ । घांस माखे लाळ खाय त्यांची ॥१०॥ त्यांचिये मुखींचे हिरोनियां घांस । झोंबती हातांस खाय बळें ॥११॥ बळें जयाचिया ठेंगणें सकळ । तयातें गोपाळ पाडितील ॥१२॥ पाठी उचलूनि वाहातील खांदीं । नाचतील मांदीं मेळवुनी ॥१३॥ मांदीं मेळवुनी धणी दिली आम्हां । तुका म्हणे जमा केल्या गाईं ॥१४॥