भजनी मालिका
← भजनांकडे परत

शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले

shubh mat tihin anili gopalin | chendu vanamali gheuni ale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥१॥ आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली पुढी हरुषें मात ॥२॥ हरुषलीं माता केलें निंबलोण । गोपाळांवरून कुरवंडी ॥३॥ गोपाळां भोवतें मिळालें गोकुळ । अवघीं सकळ लहान थोरें ॥४॥ थोर सुख झालें ते काळीं आनंद । सांगती गोविंद वरी आला ॥५॥ आले वरी बैसोनियां नारायण । काळया नाथून वहन केलें ॥६॥ नगराबाहेरी निघाले आनंदें । लावूनियां वाद्यें नाना घोष ॥७॥ नारायणापुढें गोपाळ चालती । आनंदें नाचती गाती गीत ॥८॥ तंव तो देखिला वैकुंठींचा पती । लोटांगणीं जाती सकळ ही ॥९॥ सकळ ही एका भावें आलिंगिले । अवघियां झाले अवघे हरी ॥१०॥ हरी आळीगुनीहरीरूप झालीं । आप विसरलीं आपणास ॥११॥ सकळांसी सुख एक दिलें देवें । मायबापां भावें लोकपाळां ॥१२॥ मायबाप देवा नाहीं लोकपाळ । सारिखीं सकळ तुका म्हणे ॥१३॥