भजनी मालिका
← भजनांकडे परत

शंख करिशी ज्याच्या नांवें । त्याचें तुज नाहीं ठावें । ऐक सांगतों एका भावें । सांपडे घरीं तें जीवउनि खावें रे विठ्ठल

shankh karishi jyachya nanven | tyachen tuj nahin thaven | aik sangaton eka bhaven | sampade gharin ten jivauni khaven re viththal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शंख करिशी ज्याच्या नांवें । त्याचें तुज नाहीं ठावें । ऐक सांगतों एका भावें । सांपडे घरीं तें जीवउनि खावें रे विठ्ठल ॥१॥ टिळे माळा करंडी सोंग । धरुनि चाळविलें जग । पसरी हात नाहीं त्याग । दावी दगड पुजी भग रे विठ्ठल ॥२॥ राख लावुनि अंग मळी । वाये ठोके मी एक बळी । वासने हातीं बांधवी नळी । त्यासि येउनि काळ गिळी उगळी रे विठ्ठल ॥३॥ कोण तें राहडीचें सुख । वरते पाय आरतें मुख । करवी पीडा भोगवी दुःख । पडे नरकीं परी न पळे चि मूर्ख रे विठ्ठल ॥४॥ सिकला फाक मारी हाका । रांडा पोरें मेळवी लोकां । विटंबी शरीर मागे रुका । केलें तें गेलें अवघें चि फुका रे विठ्ठल ॥५॥ कळावें जनां मी एक बळी । उभा राहोनि मांडी फळी । फोडोनि गुडघे कोंपर चोळी । आपला घात करोनि आपण चि तळमळी रे विठ्ठल ॥६॥ फुकट खेळें ठकलीं वांयां । धरुनि सोंग बोडक्या डोया । शिवों नये ती अंतरीं माया । संपादणीविण विटंबिली काया रे विठ्ठल ॥७॥ धुळी माती कांहीं खेळों च नका । जवादी चंदन घ्यावा बुका । आपणा परिमळ आणिकां लोकां । मोलाची महिमा फजिती फुका रे विठ्ठल ॥८॥ बहुत दुःखी जालियां खेळें । अंगीं बुद्धि नाहींत बळें । पाठीवरी तोबा तोंड काळें । रसना द्रवे उपस्थाच्या मुळें रे विठ्ठल ॥९॥ काय सांगतो तें ऐका तुका । मोडा खेळ कांहीं अवगों च नका । चला जेवूं आधीं पोटीं लागल्या भुका । धाल्यावरी बरा टाकमटिका रे विठ्ठल ॥१०॥