भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वसुखाचिया आशा जन्म गेला । क्षण मुक्ती यत्न नाहीं केला । हिंडतां दिशा सीण पावला । मायावेष्टिला जीव माझा

sarvasukhachiya asha janma gela | kshan mukti yatna nahin kela | hindatan disha sin pavala | mayaveshtila jiv majha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्वसुखाचिया आशा जन्म गेला । क्षण मुक्ती यत्न नाहीं केला । हिंडतां दिशा सीण पावला । मायावेष्टिला जीव माझा ॥१॥ माझें स्वहित नेणती कोणी । कांहीं न करितां मजवांचुनी । स्वजन तंव सुखमांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥ध्रु.॥ काय सांगों गर्भीची यातना । मज भोगितां नारायणा । मांस मळ मूत्र जाणा । तुज क्षणक्षणा ध्यात असें ॥२॥ मज चालतां प्रयाणकाळीं। असतां न दिसती जवळी । मृत्तिके मृत्तिका कवळी । एकले मेळीं संचिताचे ॥३॥ आतां मज ऐसें करीं गा देवा । कांहीं घडे तुझी चरणसेवा । तुका विनवीतसे केशवा । चालवीं दावा संसारें ॥४॥