भजनी मालिका
← भजनांकडे परत

परिसें गे सुनेबाई । नको वेचूं दूध दहीं

parisen ge sunebai | nako vechun dudh dahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
परिसें गे सुनेबाई । नको वेचूं दूध दहीं ॥१॥ आवा चालिली पंढरपुरा । वेसीपासुनि आली घरा ॥ध्रु.॥ ऐकें गोष्टी सादर बाळे । करीं जतन फुटकें पाळें ॥२॥ माझे हातींचा कलवडू । मजवाचुंनि नको फोडूं ॥३॥ वळवटिक्षरीचें लिंपन । नको फोडूं मजवांचून ॥४॥ उखळ मुसळ जातें । माझें मन गुंतलें तेथें ॥५॥ भिक्षुक आल्या घरा । सांग गेली पंढरपुरा ॥६॥ भक्षीं मपित आहारु । नको फारसी वरो सारूं ॥७॥ सून म्हणे बहुत निकें । तुम्ही यात्रेसि जावें सुखें ॥८॥ सासूबाई स्वहित जोडा । सर्व मागील आशा सोडा ॥९॥ सुनमुखीचें वचन कानीं । ऐकोनि सासू विवंची मनीं ॥१०॥ सवतीचे चाळे खोटे । म्यां जावेंसें इला वाटे ॥११॥ आतां कासया यात्रे जाऊं । काय जाउनि तेथें पाहूं ॥ १२॥ मुलें लेंकरें घर दार । माझें येथें चि पंढरपूर ॥१३॥ तुका म्हणे ऐसें जन । गोवियेलें मायेंकरून ॥१४॥