भजनी मालिका
← भजनांकडे परत

मी तंव अनाथ अपराधी । कर्महीन मतिमंदबुद्धी । तुज म्यां आठविलें नाहीं कधीं । वाचे कृपानीधी मायबापा

mi tanv anath aparadhi | karmahin matimandabuddhi | tuj myan athavilen nahin kadhin | vache krupanidhi mayabapa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मी तंव अनाथ अपराधी । कर्महीन मतिमंदबुद्धी । तुज म्यां आठविलें नाहीं कधीं । वाचे कृपानीधी मायबापा ॥१॥ नाहीं ऐकिलें गाइलें गीत । धरिली लाज सांडिलें हित । नावडे पुराण बैसले संत । केली बहुत परनिंदा ॥ध्रु.॥ केला करविला नाहीं उपकार। नाहीं दया आली पीडितां पर । करू नये तो केला व्यापार। वाहिला भार कुटुंबाचा ॥२॥ नाही केलें तीर्थाचें भ्रमण । पाळिला पिंड करचरण । नाहीं संतसेवा घडलें दान । पूजावलोकन मुर्तीचें ॥३॥ असंगसंग घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय । न कळे हित करावें तें काय । नये बोलूं आठवूं तें ॥४॥ आप आपण्या घातकर। शत्रु जालों मी दावेदार । तूं तंव कृपेचा सागर। उतरीं पार तुका म्हणे ॥५॥