भजनी मालिका
← भजनांकडे परत

म्हणे चेंडू कोणें आणिला या ठाया । आलों पुरवावया कोड त्याचें

mhane chendu konen anila ya thaya | alon puravavaya kod tyachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
म्हणे चेंडू कोणें आणिला या ठाया । आलों पुरवावया कोड त्याचें ॥१॥ त्याचें आइकोन निष्ठुर वचन । भयाभीत मन जालें तीचें ॥२॥ तिची चित्तवृत्ती होती देवावरी । आधीं ते माघारी फिरली वेगीं ॥३॥ वेगीं मन गेलें भ्रताराचे सोयी । विघ्न आलें कांहीं आम्हांवरीं ॥४॥ वरी उदकास नाहीं अंत पार । अक्षोभ सागर भरलासे ॥५॥ संचार करूनि कोण्या वाटे आला । ठायीं च देखिला अवचिता ॥६॥ अवचिता नेणों येथें उगवला । दिसे तो धाकुला बोल मोठे ॥७॥ मोठ्यानें बोलतो भय नाहीं मनीं । केला उठवूनी काळ जागा ॥८॥ जागविला काळसर्प तये वेळीं । उठिला कल्लोळीं विषाचिये ॥९॥ यमुनेच्या डोहावरी आला ऊत । काळ्याकृतांतधुधुकारें ॥१०॥ कारणें ज्या येथें आला नारायण । झालें दर्शन दोघांमध्ये ॥११॥ दोघांमध्यें झाले बोल परस्परें । प्रसंग उत्तरें युद्धाचिया ॥१२॥ चिंतावला चित्ती तोंडे बोले काळ । करीन सकळ ग्रास तुझा ॥१३॥ झाला सावकाश झेंप घाली वरी । तंव म्हणे हरी मुष्टिघातें ॥१४॥ तेणें काळें त्यासि दिसे काळ तैसा । हरावया जैसा जीव आला ॥१५॥ आठवले काळा हाकारिलें गोत । मिळालीं बहुत नागकुळें ॥१६॥ कल्हारीं संधानीं वेष्ठीयेला हरी । अवघा विखारीं व्यापियेला ॥१७॥ यांस तुका म्हणे नाहीं भक्तीविण । गरुडाचें चिंतन केलें मनीं ॥१८॥