भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी

manorath jaise gokulinchya jana | puravavi vasana tayapari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥१॥ रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥२॥ सीण झाला वसुदेवदेवकीस । वधी बाळें कंस दुराचारी ॥३॥ दुराचारियासी नाहीं भूतदया । आप पर तया पाप पुण्य ॥४॥ पुण्यकाळ त्याचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥५॥ गर्भासी तयांच्या आला नारायण । तुटलें बंधन आपेंआप ॥६॥ आपेंआप बेड्या तुटल्या शंकळा । बंदाच्या आर्गळा कुलुपे कोंडे ॥७॥ कोंडमार केला होता बहु दिस । सोडवी निमिष नलगतां ॥८॥ न कळे तो त्यासी सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ॥९॥ नंदाघरीं जातां येतां वसुदेवा । नाहीं झाला गोवा सवें देव ॥१०॥ सवें देव तया आड नये कांहीं । तुका म्हणे नाहीं भय चिंता ॥११॥