भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा तंव खुंटला उपाव । जेणें तुझे आतुडती पाव । करूं भक्ती तरि नाहीं भाव । नाहीं हातीं जीव कवणेविशीं

majha tanv khuntala upav | jenen tujhe atudati pav | karun bhakti tari nahin bhav | nahin hatin jiv kavanevishin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझा तंव खुंटला उपाव । जेणें तुझे आतुडती पाव । करूं भक्ती तरि नाहीं भाव । नाहीं हातीं जीव कवणेविशीं ॥१॥ धर्म करूं तरि नाहीं चित्त । दान देऊं तरि नाहीं वित्त । नेणें पुजों ब्राम्हण अतीत । नाहीं भूतदया पोटा हातीं ॥२॥ नेणें गुरुदास्य संतसेवन । जप तप अनुष्ठान । नव्हे वैराग्य वनसेवन । नव्हे दमन इंद्रियांसी ॥३॥ तीर्थ करूं तरि मन नये सवें । व्रत करूं तरि विधि नेणें स्वभावें । देव जरि आहे म्हणों मजसवें । तरि आपपरावें न वंचे ॥४॥ म्हणोनि झालों शरणागत । तुझा दास मी अंकित । यास कांहीं न लगे संचित । झालों निश्चिंत तुका म्हणे ॥५॥