भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण । ऐसें तुम्ही सांगा संतजन । करा समाधान चित्त माझें

kay mi uddhar paven | kay krupa karil narayan | aisen tumhi sanga santajan | kara samadhan chitta majhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण । ऐसें तुम्ही सांगा संतजन । करा समाधान चित्त माझें ॥१॥ काय हें खंडईल कर्म । पारुषतील धर्माधर्म । कासयानें तें कळे वर्म । म्हणउनी श्रम वाटतसे ॥ध्रु.॥ काय हो स्थिर राहेल बुद्धी । कांहीं अरिष्ट न येल मधीं । धरिली जाइल ते शुद्धी । शेवट कधीं तो मज न कळे ॥२॥ काय ऐसें पुण्य होईल गांठीं । घालीन पायीं देवाचे मिठी । मज तो कुरवाळील जगजेठी । दाटइन कंठीं सद्गदित ॥३॥ काय हे निवतील डोळे । सुख तें देखोनी सोहळे । संचित कैसें तें न कळे । होतील डोहळे वासनेसी ॥४॥ ऐसी चिंता करीं सदा सर्वकाळ । रात्रिदिवस तळमळ । तुका म्हणे नाहीं आपुलें बळ । जेणें फळ पावें निश्चयेंसी ॥५॥