भजनी मालिका
← भजनांकडे परत

करावा कैवाड । नाहीं तरी आला नाड

karava kaivad | nahin tari ala nad

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करावा कैवाड । नाहीं तरी आला नाड ॥१॥ स्मरा पंढरीचा देव । मनीं धरोनिया भाव ॥ध्रु.॥ खचविलें काळें । उगवा लवलाहें जाळें ॥२॥ गजर नामाचा । करा लवलाहे वाचा ॥३॥ घरटी चक्रफेरा । जन्ममृत्याचा भोंवरा ॥४॥ नानाहव्यासांची जोडी । तृष्णा करी देशधडी ॥५॥ चरणीं ठेवा चित्त । म्हणवा देवाचे अंकित ॥६॥ छंदे नानापरी । कळा न पविजे हरी ॥७॥ जगाचा जनिता । भुक्तीमुक्तींचा ही दाता ॥८॥ झणी माझें माझें । भार वागविसी ओझें ॥९॥ यांची कां रे गेली बुद्धि । नाहीं तरायाची शुद्धि ॥१०॥ टणक धाकुलीं । अवघीं सरती विठ्ठलीं ॥११॥ ठसा त्रिभुवनीं । उदार हा शिरोमणि ॥१२॥ डगमगी तो वांयां जाय । धीर नाहीं गोता खाय ॥१३॥ ढळों नये जरी । लाभ घरिचिया घरीं॥१४॥ नाहीं ऐसें राहे । कांहीं नासिवंत देहे ॥१५॥ तरणा भाग्यवंत । नटे हरीकीर्तनांत ॥१६॥ थडी टाकी पैलतीर । बाहे ठोके होय वीर ॥१७॥ दया तिचें नांव । अहंकार जाय जीवे ॥१८॥ धनधान्य हेवा । नाडे कुटुंबाची सेवा ॥१९॥ नाम गोविंदाचें । घ्या रे हें चि भाग्य साचें ॥२०॥ परउपकारा । वेचा शक्ती निंदा वारा ॥२१॥ फळ भोग इच्छा । देव आहे जयां तैसा ॥२॥ बरवा ऐसा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥२३॥ भविष्याचे माथां । भजन न द्यावें सर्वथा ॥२४॥ माग लागला न संडीं । अळसें माती घालीं तोंडीं ॥२५॥ यश कीर्ती मान । तरी जोडे नारायण ॥२६॥ रवि लोपे तेजें । जरी हारप हें दुजें ॥२७॥ लकार लाविला । असतां नसतां चि उगला ॥२८॥ वासने चि धाडी । बंद खोड्या नाड्या बेडी ॥२९॥ सारतें न कळे । काय झांकियेले डोळे ॥३०॥ खंती ते न धरा । होणें गाढव कुतरा ॥३१॥ सायासाच्या जोडी । पिके काढियेल्या पेडी ॥३२॥ हातीं हित आहे । परि न करिसी पाहें॥३३॥ अळंकार लेणें । ल्या रे तुळसीमुद्राभूषणें ॥३४॥ ख्याति केली विष्णुदासीं । तुका म्हणे पाहा कैसी ॥३५॥