भजनी मालिका
← भजनांकडे परत

कपट कांहीं एक । नेणें भुलवायाचें लोक

kapat kanhin ek | nenen bhulavayachen lok

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कपट कांहीं एक । नेणें भुलवायाचें लोक ॥१॥ तुमचें करितों कीर्त्तन । गातों उत्तम ते गुण ॥ध्रु.॥ दाऊं नेणें जडीबुटी । चमत्कार उठाउठी ॥२॥ नाहीं शिष्यशाखा । सांगों अयाचित लोकां ॥३॥ नव्हें मठपति । नाहीं चाहुरांची वृत्ति ॥४॥ नाहीं देवार्चन । असे मांडिलें दुकान ॥५॥ नाहीं वेताळ प्रसन्न । कांहीं सांगों खाण खुण ॥६॥ नव्हें पुराणिक । करणें सांगणें आणीक ॥७॥ नाहीं जाळीत भणदीं । उदो म्हणोनि आनंदी ॥८॥ नेणें वाद घटा पटा । करितां पंडित करंटा ॥९॥ नाहीं हालवीत माळ । भोंवतें मेळवुनि गबाळा ॥१०॥ आगमीचें कुडें नेणें । स्तंभन मोहन उच्चाटणें ॥११॥ नव्हें यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा ॥१२॥