भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळयाचे मागे चेंडु पत्नीपाशीं । तेजःपुंज राशी देखियेला

kalayache mage chendu patnipashin | tejahpunj rashi dekhiyela

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काळयाचे मागे चेंडु पत्नीपाशीं । तेजःपुंज राशी देखियेला ॥१॥ लावण्यपूतळा मुखप्रभाराशी । कोटि रवि शशी उगवले ॥२॥ उघवला खांब कर्दळीचा गाभा । ब्रीदें वांकी नभा देखे पायीं ॥३॥ पाहिला सकळ तिनें न्याहाळूनि । कोण या जननी विसरली ॥४॥ विसरु हा तीस कैसा याचा झाला । जीवाहुनि वाल्हा दिसतसे ॥५॥ दिसतसे रूप गोजिरें लाहान । पाहातां लोचन सुखावले ॥६॥ पाहिलें पर्तोनि काळा दुष्टाकडे । मग म्हणे कुडें झालें आतां ॥७॥ आतां हा उठोनि खाईंल या बाळा । देईंल वेल्हाळा माय जीव ॥८॥ जीव याचा कैसा वांचे म्हणे नारी । मोहिली अंतरीं हरीरूपें ॥९॥ रूपे अनंताचीं अनंतप्रकार । न कळे साचार तुका म्हणे ॥१०॥