भजनी मालिका
← भजनांकडे परत

काकुलती एकें पाहाती बाहेरी । तया म्हणे हरी वोसरला

kakulati eken pahati baheri | taya mhane hari vosarala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काकुलती एकें पाहाती बाहेरी । तया म्हणे हरी वोसरला ॥१॥ वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥२॥ कवतुक जालें ते काळीं आनंद । कळला गोविंद साच भावें ॥३॥ भावें तयापुढें नाचती सकळें । गातील मंगळें ओंव्या गीत ॥४॥ गीत गाती ओंव्या रामकृष्णावरी । गोपाळ मोहोरी वाती पांवे ॥५॥ वत्सें गाईं पशू नाचती आनंदें । वेधलिया छंदें गोविंदाच्या ॥६॥ चित्त वेधियेलें गोविंदें जयाचें । कोण तें दैवाचें तयाहुनि ॥७॥ तयाहुनि कोणी नाहीं भाग्यवंत । अखंड सांगात गोविंदाचा ॥८॥ गोविंदाचा संग तुका म्हणे ध्यान । गोविंद ते जन गोकुळींचे ॥९॥