भजनी मालिका
← भजनांकडे परत

इतुलें करीं भलत्या परी । परद्रव्य परनारी । सांडुनि अभिलाष अंतरीं । वर्तें वेव्हारीं सुखरूप

itulen karin bhalatya pari | paradravya paranari | sanduni abhilash antarin | varten vevharin sukharup

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
इतुलें करीं भलत्या परी । परद्रव्य परनारी । सांडुनि अभिलाष अंतरीं । वर्तें वेव्हारीं सुखरूप ॥१॥ न करीं दंभाचा सायास । शांती राहें बहुवस । जिव्हे सेवीं सुगंधरस । न करीं आळस रामनामीं ॥२॥ जनमित्र होई सकळांचा । अशुभ न बोलावी वाचा । संग न धरावा दुर्जनाचा । करीं संतांचा सायास ॥३॥ करिसी देवाविण आस । अवघी होईल निरास । तृष्णा वाढविसी बहुवस । कधीं सुखास न पवसी ॥४॥ धरूनि विश्वास करीं धीर । करितां देव हाचि निर्धार । तयाचा वाहे योगक्षेमभार । नाहीं अंतर तुका म्हणे ॥५॥