भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोन्ही टिपरीं एक चि नाद । सगुण निर्गुण नाहीं भेद रे । कुसरी अंगें मोडितील परी । मेळविति एक एका छंदें रे

donhi tiparin ek chi nad | sagun nirgun nahin bhed re | kusari angen moditil pari | melaviti ek eka chhanden re

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दोन्ही टिपरीं एक चि नाद । सगुण निर्गुण नाहीं भेद रे । कुसरी अंगें मोडितील परी । मेळविति एक एका छंदें रे ॥१॥ कांहींच न वजे वांयां रे । खेळिया एक चि बसवंत अवघियां रे । सम विषम तेथें होऊं च नेदी । जाणऊनि आगळिया रे ॥ध्रु.॥ संत महंत सद्धि खेळतील घाई । ते च सांभाळी माझ्या भाई रे । हात राखोन हाणिती टिपर्‍या । टिपरी मिळोनि जाय त्याची सोई रे ॥२॥ विताळाचें अवघें जाईल वांयां । काय ते शृंगारूनि काया रे । निवडूनि बाहेर काढिती निराळा । जो न मिळे संताचिया घाई रे ॥३॥ प्रकाराचें काज नाहीं सोडीं लाज । निःशंक होउनियां खेळें रे । नेणतीं नेणतीं च एकें पावलीं मान । विठ्ठल नामाचिया बळें रे ॥४॥ रोमांच गुढिया डोलविती अंगें । भावबळें खेळविती सोंगें रे । तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे । या विठोबाच्या अंगसंगें रे ॥५॥