भजनी मालिका
← भजनांकडे परत

डोळियां पाझर कंठ माझा दाटे । येऊं देई भेटे पांडुरंगे

doliyan pajhar kanth majha date | yeun dei bhete pandurange

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
डोळियां पाझर कंठ माझा दाटे । येऊं देई भेटे पांडुरंगे ॥१॥ बहु दिस टाकिले निरास कां केलें । कोठें वो गुंतलें चित्त तुझें ॥ध्रु.॥ बहु धंदा तुज नाहीं वो आठव । राहिलासे जीव माझा कंठीं ॥२॥ पंढरीस जाती वारकरी संतां । निरोप बहुतां हातीं धाडीं ॥३॥ तुजविण कोण सांवा धांवा करी । ये वो झडकरी पांडुरंगे ॥४॥ काय तुझी वाट पाहों कोठवरी । कृपाळु कांपरी विसरलासी ॥५॥ एक वेळ माझा धरूनि आठव । तुका म्हणे ये वो न्यावयासी ॥६॥