भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा आदिदेवा जगत्रया जीवा । परियेसीं केशवा विनंती माझी

deva adideva jagatraya jiva | pariyesin keshava vinanti majhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवा आदिदेवा जगत्रया जीवा । परियेसीं केशवा विनंती माझी ॥१॥ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम । ऐसी देई प्रेम कांहीं कळा ॥२॥ कळा तुजपाशीं आमचें जीवन । उचित करून देई आम्हां ॥३॥ आम्हां शरणागतां तुझा चि आधार । तूं तंव सागर कृपासिंधु ॥४॥ सिंधु पायावाट होय तुझ्या नामें । जाळीं महाकर्में दुस्तरें तीं ॥५॥ तीं फळें उत्तमें तुझा निजध्यास । नाहीं गर्भवास सेविलिया ॥६॥ सेविंलिया राम कृष्ण नारायण । नाहीं त्या बंधन संसाराचें ॥७॥ संसार तें काय तृणवतमय । अग्नि त्यासी खाय क्षणमात्रें ॥८॥ क्षणमात्रें जाळी दोषांचिया रासी । निंद्य उत्तमासी वंद्य करी ॥९॥ करीं ब्रिदें साचे आपले आपण । पतितपावन दिनानाथ ॥१०॥ नाथ अनाथाचा पति गोपिकांचा । पुरवी चित्तीचा मनोरथ ॥११॥ चित्ती जें धरावें तुका म्हणे दासीं । पुरविता होसी मनोरथा ॥१२॥