भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतनासी न लगे वेळ । कांही न लगे तया मोल । वाचे वदा सर्वकाळ । राम हरी गोविंद

chintanasi na lage vel | kanhi na lage taya mol | vache vada sarvakal | ram hari govind

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चिंतनासी न लगे वेळ । कांही न लगे तया मोल । वाचे वदा सर्वकाळ । राम हरी गोविंद ॥१॥ हाचि पुरे मंत्र सोपा । तेणें चुके जन्म खेपा । आणिक तें पापा । कधी नुरें कल्पातीं ॥२॥ चौर्‍यांशीची न ये फेरी । एवढी चिंतनाची ही थोरी । सांडोनी वेरझारी । का रे शिणतां बापुडी ॥३॥ एका जनार्दनीं चिंतन । वाचे वदा परिपूर्ण । तेणें घडे कोटीयज्ञ । नाम चिंतन जपतां ॥४॥