भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूतदयापरत्वें जया तया परी । संत नमस्कारीं सर्वभावें

bhutadayaparatven jaya taya pari | sant namaskarin sarvabhaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भूतदयापरत्वें जया तया परी । संत नमस्कारीं सर्वभावें ॥१॥ शिकल्या बोलाचा धरीसील ताठा । तरी जासी वाटा यमपंथें ॥ध्रु.॥ हिरा परिस मोहरा आणीक पाषाण । नव्हे परी जन संतां तैसी ॥२॥ सरितां वोहोळ गंगा सागरा । लेखी तयाहून अधम नाहीं ॥३॥ आणीक अमुप होती तारांगणें । रविसी समान लेखूं नये ॥४॥ तुका म्हणे नाहीं नम्रता अंगी । नव्हे तें फिरंगी कठिण लोह ॥५॥