भजनी मालिका
← भजनांकडे परत

भगवंता तुजकारणें मेलों जीता चि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाहीं तयासी

bhagavanta tujakaranen melon jita chi kaisi | nishkam buddhi theli chalan nahin tayasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भगवंता तुजकारणें मेलों जीता चि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाहीं तयासी । न चलती हात पाय दृष्टी फिरली कैसी । जाणतां न देखों गा क्षर आणि अक्षरासी ॥१॥ विठोबा दान दे गा तुझ्या सारिखें नामा । कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥ध्रु.॥ भुक्तिमुक्ति तूं चि एक होसि सिद्धीचा दाता । म्हणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता । सर्वस्वें त्याग केला धांव घातली आतां । कृपादान देई देवा येउनि सामोरा आतां ॥२॥ संसारसागरू गा भवदुःखाचें मूळ । जनवाद अंथरुण माजी केले इंगळ । इंद्रियें वज्रघातें तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ॥३॥ तिहीं लोकीं तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंघलों वरी खोडा भाव धरूनि टेंका । जाणवी नरनारी जागो धरम लोकां । पावती पुण्यवंत सोई आमुचिये हाका ॥४॥ नाठवे आपपर आतां काय बा करूं । सारिखा सोइसवा हारपला विचारू । घातला योगक्षेम तुज आपुला भारू । तुकया शरणागता देई अभयकरू ॥५॥