भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघ्या दशा येणें साधती । मुख्य उपासना सगुणभक्ती। प्रगटे हृदयींची मूर्ती । भावशुद्धी जाणोनियां

avaghya dasha yenen sadhati | mukhya upasana sagunabhakti| pragate hrudayinchi murti | bhavashuddhi janoniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघ्या दशा येणें साधती । मुख्य उपासना सगुणभक्ती। प्रगटे हृदयींची मूर्ती । भावशुद्धी जाणोनियां ॥१॥ बीज आणि फळ हरींचे नाम । सकळ पुण्य सकळ धर्म । सकळां काळांचें हे वर्म। निवारी श्रम सकळ ही ॥ध्रु.॥ जेथें कीर्तन हें नामघोष । करिती निर्लज्ज हरीचे दास । सकळ वोथंबले रस । तुटती पाश भवबंधाचे ॥२॥ येती अंगा वसती लक्षणें । अंतरीं देवें धरिलें ठाणें। आपण चि येती तयाचा गुण । जाणें येणें खुंटे वस्तीचें ॥३॥ न लगे सांडावा आश्रम । उपजले कुळींचे धर्म । आणीक न करावे श्रम । एक पुरे नाम विठोबाचें ॥४॥ वेदपुरुष नारायण । योगियांचें ब्रम्ह शून्य । मुक्ता आत्मा परिपूर्ण । तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हां ॥५॥