भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां पावन सकळ सुखें । खादलें कदा तें नखें । अवघे सरलें पारिखें । सकळ देखें माहियरें

atan pavan sakal sukhen | khadalen kada ten nakhen | avaghe saralen parikhen | sakal dekhen mahiyaren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां पावन सकळ सुखें । खादलें कदा तें नखें । अवघे सरलें पारिखें । सकळ देखें माहियरें ॥१॥ जवळी विठ्ठल रखुमाई । बहिणी बंधु बाप आई । सकळ गोताची च साई । पारिखें काई ऐसें नेणिजे ॥ध्रु.॥ जगदाकारीं जाली सत्ता । वारोनी गेली पराधीनता । अवघे आपुलें चि आतां । लाज आणि चिंता दुहावली ॥२॥ वावरे इच्छा वसे घरीं । आपुले सत्तेचे माहेरीं । करवी तैसें आपण करी । भीड न घरी चुकल्याची ॥३॥ सोसिला होता सासुरवास। बहुतांचा बहुत दिवस । बहु कामें पुरविला सोस । आतां उदास आपुल्यातें ॥४॥ करिती कवतुक लाडें । मज बोलविती कोडें । मायबाप उत्तरें गोडें । बोले बोबडें पुढें तुका ॥५॥