भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां मी अनन्य येथें अधिकारी । होइन कोणे परी नेणें देवा

atan mi ananya yethen adhikari | hoin kone pari nenen deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां मी अनन्य येथें अधिकारी । होइन कोणे परी नेणें देवा ॥१॥ पुराणींचा अर्थ ऐकतां मानस । होय कासावीस जीव माझा ॥ध्रु.॥ इंद्रियांचे आम्ही पांगिलों अंकित । त्यांच्यारगें चित्त रंगलें तें ॥२॥ एकाचें ही जेथें न घडे दमन । अवघीं नेमून कैसीं राखों ॥३॥ तुका म्हणे जरी मोकळिसी आतां । तरी मी अनंता वांयां गेलों ॥४॥