भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि

apulalyapari karitil seva | git gati deva khelavuni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥१॥ खेळु मांडियेला यमुने पाबळीं । या रे चेंडुफळी खेळूं आतां ॥२॥ आणविल्या डांगा चवगुणां काठी । बैसोनिया वांटी गडिया गडी ॥३॥ गडी जंव पाहे आपणासमान । नाहीं नारायण म्हणे दुजा ॥४॥ जाणोनि गोविंदें सकळांचा भाव । तयांसि उपाव तोचि सांगे ॥५॥ सांगे सकळांसि व्हा रे एकीठायी । चेंडू राखा गडे तुम्ही माझा ॥६॥ मज हा न लगे आणीक सांगाती । राखावी बहुतीं हाल माझी ॥७॥ माझे हाके हाक मेळवा सकळ । नव जा बरळ एकमेकां ॥८॥ एका समतुकें अवघेचि राहा । जाईंल तो पाहा धरा चेंडू ॥९॥ चेंडू धरा ऐसें सांगतो सकळां । आपण निराळा एकला चि ॥१०॥ चिंडुनियां चेंडू हाणे ऊर्ध्वमुखें । ठेलीं सकळिक पाहात चि ॥११॥ पाहात चि ठेलीं न चलतां कांहीं । येरू लवलाहीं म्हणे धरा ॥१२॥ धरावा तयानें त्याचें बळ ज्यासि । येरा आणिकांसि लाग नव्हे ॥१३॥ नव्हे काम बळ बुद्धी नाहीं त्याचें । न धरवे निंचें उंचाविण ॥१४॥ विचारीं पडिले देखिले गोपाळ । या म्हणे सकळ मजमागें ॥१५॥ मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥१६॥ चतुर चिंतिती बहुत मारग । हरी जाय लाग पाहोनियां ॥१७॥ या मागें जे गेले गोविंदा गोपाळ । ते नेले सीतळ पंथ ठायां ॥१८॥ पंथ जे चुकले आपले मतीचे । तयांमागें त्यांचे ते चि हाल ॥१९॥ हाल दोघां एक मोहरे मागिलां । चालतां चुकलां वाट पंथ ॥२०॥ पंथ पुढिलांसी चालतां न कळे । मागिलांनीं डोळे उघडावे ॥२१॥ वयाचा प्रबोधे विचार ज्या नाहीं । समान तो देहीं बाळकांसी ॥२२॥ सिकविलें हित नायिके जो कानीं । त्यामागें भल्यांनीं जाऊं नये ॥२३॥ नये तें चि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तोचि खरा ॥२४॥ रानभरी झाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ॥२५॥ लाज सांडूनियां मारितील हाका । कळलें नायका वैकुंठींच्या ॥२६॥ चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणीती । तया अति प्रीति गोपाळांची॥२७॥ गोपाळांचा धांवा आइकिला कानीं । सोयी चक्रपाणि पालविलें॥२८॥ सायी धरूनियां आले हरीपासीं । लहान थोरांसी सांभाळिलें ॥२९॥ सांभाळिलें तुका म्हणे सकळ हि । सुखी झाले ते ही हरीमुखें ॥३०॥